हर्सूल तलाव जलपूजनातही खैरे -दानवेंनी साधले वेगवेगळे मूहूर्त!

Foto
 निसर्गाच्या कृपेने तब्बल 14 वर्षानंतर भरलेल्या हर्सूल तलावाच्या जलपूजनावरून आज खैरे -दानवे गट पुन्हा आमने-सामने आले. पुरोहितांच्या मंत्रघोषात अंबादास दानवे यांनी सकाळी साडेनऊला तर चंद्रकांत खैरे यांनी अकराच्या सुमारास तलावाचे जलपूजन करीत राजकीय मुहूर्त साधला. दुसरीकडे शिवसेना नेत्यांच्या या जलपूजनावर हर्सूल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून गेल्या वीस वर्षांपासून तलावाचे पाणी देण्याच्या आश्वासनाचे काय झाले ? असा सवाल उपस्थित केला आहे.
शहरालगत सर्वात मोठा हर्सूल तलाव यावर्षी चांगल्या पावसाने ओसांडून वाहत आहे. निसर्ग राजाच्या दानालाही राजकीय पदर देण्याचा प्रयत्न शिवसेनेने आज केला. सकाळीच साडेनऊच्या सुमारास आमदार अंबादास दानवे यांनी  शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, उपशहरप्रमुख संजय हरणे, रमेश ईधाटे, विभागप्रमुख सुरेश फसाटे, माजी नगरसेवक रूपचंद वाघमारे, बन्सी मामा जाधव आदी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तलावाचे जलपूजन केले.
त्यानंतर तासाभरातच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आमदार प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह इतर कार्यकर्त्यांसोबत हर्सूल तलावावर धाव घेतली. त्यांनीही पुरोहितांच्या  मंत्रघोषात अकराच्या सुमारास हर्सूल तलावाचे जलपूजन केले. दोन्ही नेत्यांच्या या जल पूजनाची मोठी चर्चा शहरात सुरू आहे. यापूर्वी शिवसेना वर्धापन दिन कार्यक्रमात या दोन्ही नेत्यांनी दुहीचे बीज रोवले गेले. खैरेंनी गुलमंडीवर तर दानवे यांनी क्रांतिचौकात वर्धापनदिन कार्यक्रम साजरा केला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा दोन्ही नेत्यांचे जलपूजन चर्चेत आले आहे.
श्रेष्टींचा आशीर्वाद ? 
दरम्यान शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आमदार अंबादास दानवे त्यांच्यात निर्माण झालेला बेबनाव चर्चेचा विषय झाला आहे. गेल्या चार महिन्यात दोन वेळा हे नेते आमनेसामने आले आहेत. शिवजयंती, वर्धापनदिन कार्यक्रम वेगवेगळे घेत  खैरे दानवे यांनी शिवसैनिकांना अक्षरश: वेठीस धरले होते. आताही जल पूजनाच्या निमित्ताने खैरे -दानवे यांनी वेगवेगळे मुहूर्त साधत हम साथ साथ नही है, असे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. या नेत्यांच्या वादाला श्रेष्टींचा आशीर्वाद तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगू लागली आहे.
तहानलेले ग्रामस्थ संतप्त!
 दरम्यान तलावासाठी जमिनी दिलेल्या हर्सूल ग्रामस्थांना गेल्या वीस वर्षांपासून तलावाचे थेंबभर पाणी मिळत नाही. दुसरीकडे शहरातील इतर वॉर्डांना मात्र नळ योजनेद्वारे तलावाचे पाणी दिले जाते. याबाबत अनेकदा मागणी करूनही माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे यांनी हा प्रश्न सोडविला नाही. त्यामुळेच या दोन्ही नेत्यांच्या जलपूजनावर नाराजी व्यक्त करीत ग्रामस्थांनी आज आम्हाला पाणी द्या, असे साकडे घातले. त्याचबरोबर जलपूजनासाठी गेलेल्या गावातील पुढार्‍यांनाही ग्रामस्थांनी सर्वांसमक्ष खडे बोल सुनावले.
8 हर्सूल तलावाच्या जलपूजनावरून शिवसेनेत आज पुन्हा राजकीय नाट्य रंगले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आ. अंबादास दानवे यांनी वेगवेगळे मुहूूर्त साधत जलपूजन केले.